🔔 NOTICE
☰ Menu

संजीवनी सैनिकी स्कूलच्या ब्रास बँडचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दिमाखदार सादरीकरण

Academic 16 November 2026
संजीवनी सैनिकी स्कूलच्या ब्रास बँडचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दिमाखदार सादरीकरण

गुजरातमधील एकतानगर येथे झालेल्या 'एकता परेड-२०२६' मध्ये कोपरगावच्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय विजेत्या ब्रास बँड पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर शिस्तबद्ध सादरीकरण केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधील एकतानगर येथे आयोजित भव्य 'एकता परेड-२०२६' मध्ये कोपरगाव येथील संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय विजेत्या ब्रास बँड पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अत्यंत शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक सादरीकरण केले. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत या पथकाने देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर थेट पंतप्रधानांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यासाठी पथकाला निमंत्रित करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आणि देशाच्या पंतप्रधानांसमोर कला सादर करण्याची संधी मिळवली, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. हा ऐतिहासिक क्षण संजीवनी परिवारासह परिसरातील नागरिकांनाही अनुभवता यावा, यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष बिपीन कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि संजीवनी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला. यंदाच्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी येथील विद्यार्थ्यांनीही या प्रसंगी आपल्या ब्रास बँड पथकाचे बहारदार सादरीकरण केले. उपस्थितांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यापुढेही संजीवनीच्या विद्यार्थ्यांचे कर्तृत्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असेच झळकत राहील, असा विश्वास बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केला.