संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी साईकृष्ण विकास शेलार याची तैवानमधील दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. त्याचा प्रवास, निवास व इतर खर्च विद्यापीठ करणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाची संधी उपलब्ध करून देण्याच्या संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्रयत्नांना आणखी एक यश मिळाले आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी साईकृष्ण विकास शेलार याची तैवानमधील प्रतिष्ठित दायेह विद्यापीठात दोन महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे, या इंटर्नशिपसाठी त्याचा प्रवास, निवास व इतर सर्व खर्च विद्यापीठाकडून पूर्णपणे प्रायोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातील प्रा. डॉ. सिन-लियांग ओऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तो 'आयओटी आधारित बायोमेडिकल' या आधुनिक तंत्रज्ञानविषयक विषयावर संशोधनात्मक इंटर्नशिप पूर्ण करणार आहे. तैवानमधील विविध विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी जाणारा साईकृष्ण हा संजीवनीचा ७५ वा विद्यार्थी ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणासह संशोधनाची दारे खुली करणाऱ्या संजीवनीच्या शैक्षणिक वाटचालीतील ही आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. तैवानला रवाना होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीनराव कोल्हे यांनी साईकृष्णचे अभिनंदन केले. संजीवनी विद्यापीठाचे प्रेसिडेंट तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या हस्ते साईकृष्ण व त्याच्या पालकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी डायरेक्टर डॉ. आर. ए. कापगते, डीन ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स डॉ. महेंद्र गवळी, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, तसेच साईकृष्णचे वडील विकास शेलार, आई जयश्री शेलार, आजोबा शांतवन शेलार व आजी फुलाबाई शेलार उपस्थित होते. यावेळी साईकृष्ण शेलार म्हणाला की, परदेशातील नामांकित विद्यापीठात इंटर्नशिप करण्याचे स्वप्न मी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षापासूनच पाहिले होते. तैवानमधील दायेह विद्यापीठात निवड झाल्याने माझ्यासह कुटुंबियांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.